Saturday, October 24, 2009

कविता

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल
मी फिरेन दूरदूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंब-यात अडखळेल
विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठावर हुळहुळेल
सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथे ज्योतीसह थरथरेल
जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील
माझे आस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल
जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातुन गुणगुणेल
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

1 comment: